⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दुर्दैवी : नियतीने नव्हे मनुष्याच्या कृतीने घेतला ‘ती’चा बळी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । शहरासह जिल्ह्यात दररोज अपघातात अनेकांचा बळी जात आहे. कोरोना काळात नियतीने पुढे सर्वांनी हात टेकले. कोरोनाने कितीतरी जणांचा मृत्यू झाला. जळगावात मात्र नियतीमुळे नव्हे तर मनुष्याच्या चुकीच्या कृतीने एका गायीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शर्थीचे प्रयत्न करून देखील तिचा जीव न वाचल्याने मोठा संताप व्यक्त केला जात होता. गायीच्या पोटातून प्लास्टिक बॅग, पीन, कॉईन, खिळे असा तब्बल तीस किलो कचरा बाहेर काढण्यात आला.

गोवंश वाचविण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली असती तरी अद्यापही गोवंश वाचविण्यात शंभर टक्के यश आलेले नाही. गोहत्या रोखण्यात प्रशासन आणि गोसेवक काहीसे यशस्वी ठरले असले तरी मनुष्याच्या कृतीमुळे कितीतरी गाई मृत्यूच्या विळख्यात जात आहेत. मनुष्याला लहानपणापासून संस्कार दिले जातात, अनेक नवनवीन आणि चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात पण बहुतांश लोक हे चुकीच्या गोष्टींचे किंवा आळशीपणा अंगीकारतात.

जळगाव शहराची फार दुरवस्था झाली असून स्वच्छतेची मोठी वानवा आहे. घंटागाडी दररोज येत नसल्याने कचरा रस्त्यावर टाकला जातो. शासनाने प्लास्टिक बॅगवर बंदी घातली असली तरी त्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे. शहरातील अधिकाऱ्यांचे लागेबंधे असल्याने कोणती मोठी कारवाई केले जात नाही. शहरात शनिवारी सकाळपासून मू.जे. महाविद्यालय ते भोईटे शाळा दरम्यान एक गाय मरणासन्न अवस्थेत फिरत होती. बऱ्याच वेळ एकाच जागी बसून राहिल्यानंतर ती गाय बेशुद्धावस्थेत पोहोचली. परिसरात राहणारे एक सुज्ञ नागरिक मिलिंद वाणी यांनी गाईची पाहणी करून पशू वैद्यकीय तज्ञांशी संपर्क केला. महाबळ परिसरातील डॉक्टरांनी येऊन गाईला इंजेक्शन देखील दिले परंतु त्यानंतरही फारसा फरक पडला नाही. 

वाणी यांनी पांझरापोळ संस्थांनचे विजय काबरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पशु पापा या सामाजिक संस्थेला कळविले. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गायीला पांझरापोळ संस्थेत आणण्यात आले. रात्री ९ नंतर गायीवर पशु वैद्यकीय तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेत गायीच्या पोटातून तब्बल ३० ते ३५ किलो प्लास्टिक पिशव्या, खिळे, कॉईन, तार अशा कितीतरी अनावश्यक आणि घातक गोष्टी बाहेर काढण्यात आल्या. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रात्री गायीला १२ तास निगराणीत ठेवण्यात आले परंतु पहाटे ५ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालावली.

गोप्रेमी, सुज्ञ नागरिक आणि भूतदया दाखविणाऱ्या सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले. केवळ मनुष्याच्या आणि मनपा प्रशासनाच्या कामचलाऊ कारभारामुळे एका गोमातेने जगाचा निरोप घेतला.