जळगाव लाईव्ह न्यूज । अन्न मानके कायद्यानुसार छापील किंवा वृत्तपत्राच्या कागदात कोणतेही अन्नपदार्थ बांधून देण्यास सक्त बंदी असतानाही जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका कॅन्टीन चालकाकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार अन्न प्रशासनाकडे आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कॅन्टीन चालकावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून कॅन्टीनमध्ये जाऊन २० रुपयांचा वडापाव खरेदी केला. विक्रेत्याने तो छापील कागदात गुंडाळून दिल्याची खात्री होताच अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळीच दंडात्मक कारवाई केली.

कारवाईनंतर कॅन्टीन चालकाने आपली चूक मान्य केली. त्याने तडजोड दंडाचा अर्ज दाखल करून ऑनलाइन पद्धतीने ५ हजार रुपयांचा दंड भरला. तसेच भविष्यात ग्राहकांना स्टीलच्या ताटलीत किंवा फूड-ग्रेड पॅकिंगमध्येच खाद्यपदार्थ देण्याची हमी दिली.
अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, एफएसएसएआयच्या नियमांप्रमाणे खाद्यपदार्थ पार्सल करताना किंवा गुंडाळताना केवळ फूड-ग्रेड साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे. बटर पेपर, फूड-ग्रेड पेपर बॅग, व्हेजिटेबल पार्चमेंट पेपर, अॅल्युमिनियम फॉइल किंवा फूड-ग्रेड कंटेनर यांचाच वापर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी केले आहे.
शाईमुळे कॅन्सरचा मोठा धोका
गरम समोसे, वडापाव, पोहे किंवा भजी छापील कागदावर ठेवून खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये शिसे, कॅडमियम, अलाइल नॅप्थिलामाइन्स आणि इतर घातक रसायने असतात. गरम व तेलकट पदार्थ कागदावर ठेवल्यास ही रासायनिक शाई वितळते आणि अन्नाद्वारे थेट पोटात जाते. यामुळे पोटाचा कर्करोग (कॅन्सर), यकृत व स्वादुपिंडाचे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.











