जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील महाविद्यालय परिसरात वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत अल्पवयीन वाहनचालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले.

या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी ८२ हजार रुपयांचा दंड घटनास्थळीच वसूल करण्यात आला. तसेच विविध नियमभंग प्रकरणांमध्ये ११९ ई-चलन (e-Challan) जारी करण्यात आले.

अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास त्यांच्या स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन देऊ नये तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.
ही कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिर्ले आणि प्रशांत दरेकर यांनी पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली केली. भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.












