⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भुसावळ पालिका निवडणुकीचा बिगुल वाजला ; दोन प्रभाग वाढण्याची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । कोरोनामुळे रखडलेल्या पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला गती आली असून राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मुदत संपलेल्या व समाप्त होणार्‍या 208 नगरपरीषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, सुमारे दोन महिन्यांपूर्वीच भुसावळ पालिकेने कच्ची प्रारूप प्रभाग रचना पूर्ण करून आराखडा मुंबईत पाठवला होता. त्यानंतर आदेश आल्यानंतर प्रशासनाची धावपळ वाढली आहे. भुसावळ शहरात आतापर्यंत 24 प्रभागांच्या माध्यमातून 48 नगरसेवक निवडून आले होते तर नव्या निर्देशानुसार शहरात दोन प्रभाग वाढण्याची शक्यता असून 50 नगरसेवक जनतेतून निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालिकेवर प्रशासक राज
पालिकेचा 2016 ते 2021 हा पंचवार्षिक काळ 29 डिसेंबरला संपला. यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडल्याने सध्या पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे हे पालिकेवर प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.

असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी 2 मार्चपर्यंत प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असून आयोग याला 7 मार्च 2022 रोजी मान्यता देणार आहे. यावर 10 ते 17 मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी 22 मार्च रोजी होईल. जिल्हाधिकारी याला 25 मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील तर 1 एप्रिल 2022 रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी 5 एप्रिल 2022 रोजी जाहीर करतील.

दरम्यान, ब आणि क वर्गातील नगरपालिकांसाठी हाच कार्यक्रम असून यात राज्य निवडणूक आयोगाकडे नव्हे तर पहिल्यांदा जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अर्थात, यासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी 2 मार्चपर्यंत प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणार असून ते याला 7 मार्च 2022 रोजी मान्यता देणार आहे. यावर 10 ते 17 मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी 22 मार्च रोजी होईल. तर 1 एप्रिल 2022 रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी 5 एप्रिल 2022 रोजी जाहीर करतील. यामुळे निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :