भुसावळमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची ड्युटीवर निर्घृण हत्या; हल्लेखोर अटकेत

जुलै 5, 2026 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील कवाडे नगर परिसरातील रेल्वेच्या फिल्टर हाऊसमध्ये कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (४ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण शहरासह रेल्वे वसाहतीत खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या काही वेळात आरोपीला अटक केली.

bsl murder

मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) असे असून ते भुसावळ रेल्वेमध्ये मास्टर क्राफ्ट्समन (एमसीएम) म्हणून कार्यरत होते. शनिवारी ते कवाडे नगर येथील फिल्टर हाऊसमध्ये नियमित ड्युटीवर असताना कवाडे नगर येथील रहिवासी आकाश भानुदास गोरखा (वय ३५) हा तेथे आला. कोणतेही स्पष्ट कारण नसताना त्याने लोखंडी पट्टीने कुलकर्णी यांच्या डोक्यावर सलग प्रहार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आकाश गोरखा याला काही वेळातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपी आकाश गोरखा हा मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून, २०२१ नंतर त्याच्यावर कोणताही नवीन गुन्हा नोंद झालेला नव्हता, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दीपक शेवरे, राहुल बेहेनवाल, राहुल भोई, बाटले, निकम आणि रामचंद्र गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या घटनेमुळे रेल्वे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रसाद कुलकर्णी यांच्या निधनाने रेल्वे वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now