आषाढीसाठी भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार; केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून संपूर्ण प्रवास ‘मोफत’

जुलै 2, 2026 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आषाढी एकादशीच्या निमित्ताने खान्देशासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक वारकरी पंढरपूरला जातात. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या रेल्वेतील सर्व जनरल तिकिटांची खरेदी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः केल्याने वारकऱ्यांना भुसावळ ते पंढरपूर हा प्रवास पूर्णपणे मोफत करता येणार आहे.

bslpadharpur train

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११५९ ही विशेष रेल्वे २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११६० ही रेल्वे २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळ येथे दाखल होईल.

या विशेष रेल्वेला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. रेल्वेत १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन असणार असून, ही सेवा पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची आहे.

भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विशेष रेल्वेला मंजुरी मिळाली. वारकऱ्यांवर प्रवासाचा आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने रक्षा खडसे यांनी या रेल्वेतील सर्व जनरल तिकिटे स्वतः खरेदी केली आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे जळगाव, बुलढाणा आणि परिसरातील हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोफत, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांचा प्रवास अधिक आनंददायी होणार असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now