जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२६ । भुसावळ शहरालगतच्या रेल्वे लाईनजवळील कालिका माता मंदिराच्या पूजार्यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड वस्तूने प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (२९ जून) सकाळी उघडकीस आली आहे.संतोष रघुवीर मंचल (वय ५५) असं हत्या झालेल्या पुजाराचे नाव असून या घटनेमुळे भुसावळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली

संतोष मंचल हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून कालिका माता मंदिर परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होते. मंदिरातील पूजा-अर्चा, स्वच्छता आणि तीन मंदिरांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते केवळ जेवणासाठी घरी जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

सोमवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान एक भाविक मंदिरात दर्शनासाठी आला असता मंदिराशेजारील खोलीबाहेर संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. घटनेची माहिती तातडीने पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
प्राथमिक तपासात हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला की वैयक्तिक वादातून, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले असून जळगाव येथून ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. या निर्घृण हत्येचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.








