⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

‘हडेल हप्पी जादूची झप्पी’ला उत्कृष्ट बाल वाङमय पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात २०२०-२१ वर्षासाठीच्या उत्कृष्ट बाल वाङमय पुरस्कारांची घोषणा संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांनी शनिवारी केली. बालकवितेसाठी दिला जाणारा पुरस्कार चाळीसगाव येथील कवी वीरा राठोड यांच्या “हडेल हप्पी जादूची झप्पी’ या बाल कवितासंग्रहाला जाहीर झाला.

अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा राज्यस्तरावरील पुरस्कार विज्ञानविषयक बालसाहित्य, बालकथा, बालकविता, बालनाटिका आणि बालकादंबरी अशा विविध प्रकारांसाठी देण्यात येताे. या पुरस्कारासाठी राज्यभरातून वेगवेगळे १५०हून अधिक पुस्तके स्पर्धेमध्ये होती. त्यातून वीरा राठोड यांच्या बाल कवितासंग्रहाला पुरस्कार जाहीर करण्यात आला. कवी वीरा राठोड यांचे आजवर पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. वीरा राठोड हे सध्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्टस्, एस.एम.एस सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पुरस्काराचे वितरण कोरोना नियमांचे पालन करून लवकरच पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते हाेणार आहे. पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

हे देखील वाचा :