
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील अवैध गोमांस साठवणूक आणि विक्रीविरोधात शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इस्लामपुरा परिसरातील घरावर छापा टाकून पोलिसांनी अंदाजे २१ किलो संशयित मांसासह लोखंडी सुरे, वजनकाटा, जुना फ्रिज आणि इतर साहित्य असा एकूण ११ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात दोन भावांसह घरातील चार महिला सदस्य असे एकूण सहा जण निष्पन्न झाले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल तसेच गोमांसाची अवैध साठवणूक व विक्री रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्रभावी कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहिती संकलित करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
२७ नोव्हेंबर रोजी इस्लामपुरा परिसरात गोमांसाची अवैध साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत घर क्रमांक ४४ येथे छापा टाकून तपासणी करण्यात आली. यावेळी अंदाजे २१ किलो संशयित मांस, लोखंडी सुरे, वजनकाटा, वजनाचे पातेले, जुना फ्रिज आणि लाकडी कुंदे असा एकूण ११ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या संशयित मांसाची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश राजपूत यांना बोलावण्यात आले. त्यांनी मांसाचे नमुने घेऊन ते सीलबंद केले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर मांसाबाबत अधिक स्पष्टता होणार आहे. या प्रकरणात शेख कलीम शेख अब्बास कुरेशी आणि त्याचा भाऊ नईम शेख अब्बास कुरेशी यांच्यासह घरातील चार महिला सदस्य असे एकूण सहा जण निष्पन्न झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
१५ दिवसांत तिसरी कारवाई
विशेष म्हणजे, शनिपेठ पोलिसांनी मागील १५ दिवसांत गोमांसासंदर्भात केलेली ही तिसरी कारवाई आहे. संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गाणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील कर्मचारी, गुन्हेशोध पथक तसेच महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा पाटील, वैशाली पावरा आणि प्रज्ञा इंगळे, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि निलेश घुगे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील करीत आहेत.




