जळगाव जिल्हा

महादेव मल्टीसुपर स्पेशालिटी रुग्णालयात इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

जळगाव : पोटाच्या खालच्या भागात किंवा जांघेच्या मुळाशी येणारी सूज अथवा गाठ ही इनग्विनल हर्निया या आजाराची लक्षणे असू शकतात. सुरुवातीला सामान्य वाटणार्‍या या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांसाठी महादेव मल्टीसुपर स्पेशालिटी रूग्णालयात तज्ज्ञ डॉ. तुषार चौधरी यांच्यामार्फत केली जाणारी लॅप्रोस्कोपिक इनग्विनल हर्निया रिपेअर ही आधुनिक शस्त्रक्रिया उपचारपद्धती प्रभावी पर्याय ठरत आहे.

इनग्विनल हर्नियाबाबत माहिती देतांना महादेव मल्टीसुपर स्पेशालिटी रूग्णालयातील तज्ज्ञ शल्यचिकीत्सक डॉ. तुषार चौधरी यांनी सांगितले की, इनग्विनल हर्निया म्हणजे पोटाच्या खालच्या भागातील स्नायू कमकुवत झाल्यामुळे आतड्याचा किंवा पोटातील चरबीचा काही भाग जांघेच्या मुळाशी असलेल्या कमकुवत जागेतून बाहेर येणे. उभे राहिल्यावर, खोकताना, शिंकताना किंवा वजन उचलताना ही सूज अधिक स्पष्ट दिसते. काही रुग्णांना जांघेत वेदना, जडपणा किंवा ओढल्यासारखे जाणवते. झोपल्यावर ही सूज कमी होऊ शकते.

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला जनरल अ‍ॅनेस्थेशिया म्हणजेच पूर्ण भूल दिली जाते. पोटावर साधारण तीन लहान छेद घेऊन त्यामधून कॅमेरा आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे आत सोडली जातात. कॅमेर्‍याच्या मदतीने हर्नियाची जागा निश्चित करून बाहेर आलेला आतड्याचा किंवा चरबीचा भाग पुन्हा योग्य ठिकाणी ठेवला जातो. त्यानंतर कमकुवत भागावर विशेष कृत्रिम जाळी बसवून तो मजबूत केला जातो. यामुळे हर्निया पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य
या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे मोठा छेद घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये वेदना तुलनेने कमी होतात, जखम लहान राहते आणि रुग्णाला लवकर चालणे-फिरणे शक्य होते. योग्य रुग्णांची निवड केल्यास दोन्ही बाजूंचा हर्निया एकाच वेळी दुरुस्त करता येतो. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत काही रुग्णांना दैनंदिन कामांकडे लवकर परतणे शक्य होते.शस्त्रक्रियेनंतर बहुतांश रुग्णांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच दिवशी चालणे सुरू करता येते. काही दिवसांत हलकी दैनंदिन कामे करता येतात, तर अनेक रुग्ण एक ते दोन आठवड्यांत कामावर परतू शकतात. साधारण चार ते सहा आठवड्यांपर्यंत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेणे आवश्यक असते.

योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया
महादेव मल्टीसुपर स्पेशालिटी रूग्णालयात दुर्बिणीद्वारे केली जाणारी ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत मोफत केली जाते. तरी रूग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button