गुन्हेजळगाव जिल्हा

जळगाव पोलिसांची अचानक धडक मोहीम! ठिकठिकाणी नाकाबंदी, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपासून विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६ वाजल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी आणि तपासणी सुरू करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागातही पोलीस पथके तैनात करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

उघड्यावर मद्यप्राशन, गांजा ओढणाऱ्यांवर नजर

या विशेष मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणारे, गांजा ओढणारे आणि टवाळखोरी करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

बुलेटस्वारांसह ट्रिपल सीट वाहनधारकांची तपासणी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही पोलिसांनी लक्ष्य केले आहे. बुलेटवरून नियमबाह्य प्रकार करणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. नाकाबंदीदरम्यान वाहनांची कागदपत्रे तपासली जात असून संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखले जावेत आणि वाहतूक नियमांचे पालन व्हावे, हा या मोहिमेमागील उद्देश आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अचानक सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी कोणतेही गैरप्रकार न करण्याचे आवाहन केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button