गुन्हेभुसावळ

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! भरदिवसा तीन फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील तीन घरांना लक्ष्य करत मोठी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुकाराम नगर परिसरातील स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागे असलेल्या स्वामीनारायण अपार्टमेंटमध्ये गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. या घटनेत तब्बल ५ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी प्रमोद बाबुराव पांढरे (वय ५१) यांच्यासह डॉ. प्रविण सुधाकर देशमुख आणि मनिषा ज्ञानेश्वर बंड यांच्या घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त करत सोन्याच्या बांगड्या, चैन, अंगठ्या, कानातील टॉप्स, मणीमंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.

विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चाव्यांसह बँकेचे एटीएम कार्डदेखील लंपास केले आहे. एकाच अपार्टमेंटमधील तीन घरांना लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. या घरफोडीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नव्हती. भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याने भुसावळ शहरातील घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button