गुन्हेभुसावळ

भुसावळकरांनो सावधान! तोतया पोलिसांकडून वृद्धांना लक्ष्य, सोन्याचे दागिने लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात तोतया पोलीस आणि सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. २६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भामट्यांनी दोन वृद्धांना लक्ष्य करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटनांमध्ये तब्बल ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, याप्रकरणी भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वसंत टॉकीज परिसरात ७० हजारांचे दागिने लंपास

पहिली घटना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास वसंत टॉकीजसमोर घडली. सेवानिवृत्त रवींद्र गोविंदा बारी (वय ६५, रा. लक्ष्मीनगर, वांजोळा रोड, भुसावळ) हे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आपण पोलीस असल्याची बतावणी करून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची ९ ग्रॅम सोन्याची चेन आणि २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज काढून घेत आरोपी पसार झाले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवन नायमाने तपास करीत आहेत.

दुसरी घटना त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजेच्या सुमारास नवनाथ नगर परिसरातील शीतल हाईट्स मेन रोडवर घडली. हरिशंकर जमुनाप्रसाद पाल (वय ६३, रा. संभाजीनगर, भुसावळ) यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. परिसरात खुनाची घटना घडली असून, आम्ही सरकारी अधिकारी आहोत, असे सांगत त्यांनी अंगावर सोने घालून फिरू नका, अशी भीती दाखवली.

यानंतर आरोपींनी पाल यांच्या अंगावरील १० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची चेन असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. दागिने कागदाच्या पुडीत बांधून देण्याचा बनाव करीत आरोपींनी त्यांना नकली दागिने दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे तपास करीत आहेत.

वृद्ध नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे भुसावळ शहरात तोतया पोलिसांच्या कारवायांबाबत चिंता व्यक्त होत आहे. अनोळखी व्यक्ती पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास त्यांचे ओळखपत्र तपासावे. तसेच भीती दाखवून सोन्याचे दागिने काढून घेण्याचा प्रयत्न झाल्यास दागिने त्यांच्या ताब्यात देऊ नयेत. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button