गुन्हेजळगाव शहर

Jalgaon : घर रंगवायला आला अन् कपाट साफ करून गेला! ३.४५ लाखांच्या मुद्देमालसह आरोपी जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । घरात रंगकाम सुरू असताना रंगकाम करणाऱ्या कामगारानेच संधी साधून बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने आणि २० हजारांची रोकड चोरल्याची घटना जळगाव शहरातील शिवशंकर नवीन जोशी कॉलनीत घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी या चोरीचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. गोकुळ सुरेश बागडे (वय ३६, रा. कंजरवाडा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रंगकामाच्या बहाण्याने कपाटावर डल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक पांडुरंग जोशी (वय ४३, व्यवसाय नोकरी, महावितरण) यांच्या शिवशंकर नवीन जोशी कॉलनीतील घरात रंगकाम सुरू होते. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान रंगकाम करणारा गोकुळ बागडे याने घरातील बेडरूममधील कपाटातून ३२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर जोशी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून माहिती संकलित केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे गोकुळ बागडे याला ताब्यात घेतले. त्याची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सोन्याचे दागिने आणि रोकड हस्तगत

पोलिसांनी आरोपीकडून २ लाख ७० हजार रुपये किमतीची २७ ग्रॅम वजनाची सोन्याची शॉट पोत, ५० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ५ हजार रुपये किमतीची अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गिरीष पाटील, प्रमोद लाडवंजारी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे आणि सुभाष साबळे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button