
जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात ही धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल २ हजार २०० वाहनांची तपासणी करण्यात आली असून, मोटार वाहन कायद्यान्वये ५७६ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. विविध कारवायांमधून पोलिसांनी ४ लाख ७२ हजार ५० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई
या विशेष मोहिमेदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २० जणांविरोधात ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच उघड्यावर दारू पिणाऱ्या १२ जणांवर आणि उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्या ७ जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली.
ट्रिपल सीट वाहनचालकांनाही दणका
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या दोन वाहनांवर, तर कर्कश आवाज करणारे सायलेंसर वापरणाऱ्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यातील कलम ६६/१९२ अन्वये चार केसेस दाखल करण्यात आल्या असून, नियमभंग करणारी तीन वाहने जमा करण्यात आली.
५७६ केसेस, ४.७२ लाखांचा दंड
या संपूर्ण मोहिमेत पोलिसांनी २ हजार २०० वाहनांची तपासणी केली. मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ५७६ केसेस दाखल करून ४ लाख ७२ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन करू नये तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.





