
विवरे–भवरखेडे शिवारातील सहा किलोमीटर लांबीच्या दोन मोठ्या नाल्यांच्या खोलीकरणाचे भूमिपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या मदतीबरोबरच पाण्याच्या उपलब्धतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. यापूर्वी केलेल्या ६२ किलोमीटर नाला खोलीकरणाचे फायदे आजच्या दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहेत. अनेक भागांतील विहिरींना पाण्याचा आधार मिळाला असून, हे जलसंधारणाच्या यशस्वितेचे ज्वलंत उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी थांबवायचे असेल, तर त्याच्या शिवारातील पाणी अडवले पाहिजे. नाला खोलीकरणाची ही व्यापक मोहीम शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी विवरे येथील शेतरस्ता व हनुमान मंदिरासमोरील सभागृहाच्या बांधकामाला मंजुरी देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
धरणगाव तालुक्यातील विवरे–भवरखेडे शिवारातील एकूण सहा किलोमीटर लांबीच्या दोन मोठ्या नाल्यांच्या खोलीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नाला खोदणाऱ्या हातांनाच भूमिपूजनाचा मान!
भूमिपूजन सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रमप्रतिष्ठेचा अनोखा आदर्श घालून दिला. भूमिपूजनाचा मान स्वतः न घेता प्रत्यक्ष नाला खोलीकरणाचे काम करणारे जेसीबी चालक अजित सहानी आणि जयहिंद पाल यांच्या हस्ते भूमिपूजन करवून घेतले व त्यांचा सत्कार ही केला.
ज्यांच्या घामातून शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी साठणार, त्यांच्याच हातून कामाचा शुभारंभ! पालकमंत्र्यांच्या या आगळ्यावेगळ्या कृतीतून श्रमाला प्रतिष्ठा आणि कष्टकऱ्याला सन्मान देण्याचा सकारात्मक संदेश मिळाला. हा प्रसंग सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, उद्योगपती अशोकभाऊ जैन व तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंधारणाच्या व्यापक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी जळगाव व धरणगाव तालुक्यांत ४७२ किलोमीटर नाला खोलीकरणाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यापूर्वीच्या कामांचे सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन प्रशासन, सीएसआर निधी आणि लोकसहभागातून आगामी पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
किलोमीटरपेक्षा शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी महत्त्वाचे
नाला खोलीकरणामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरण्यास, भूजल पातळी वाढण्यास आणि शेतीच्या सिंचनास मदत होणार आहे. नाला किती किलोमीटर खोदला, यापेक्षा किती शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी मिळाले आणि किती गावांची पाणीटंचाई कमी झाली, हेच या मोहिमेच्या यशाचे खरे मोजमाप असेल. जलसंधारणावर आज केलेला खर्च म्हणजे शेतकऱ्यांच्या उद्याच्या समृद्धीसाठी केलेली गुंतवणूक आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांना लोकसहभागाचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे, बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती प्रमोद पाटील, दीपक भदाणे, मुगलाल पाटील, गिरीश पाटील, भूषण महाजन, सोपान पाटील, संजय भामरे, शशी महाराज यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा नेते प्रतापराव पाटील यांनी नाला खोलीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची व्याप्ती, शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि आगामी कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैया मराठे यांनी केले, तर जलसंधारण विभागाचे उपअभियंता अमोल पाटील यांनी आभार मानले.





