
जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्यातील अडावद येथून नातेवाइकांच्या मुलाच्या लग्नाचा बस्ता घेण्यासाठी जळगाव शहरात येत असलेल्या कुटुंबाच्या कारला भीषण अपघात झाला. भरधाव कारचे पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर पलटी झाली. या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील अडावद येथील रहिवासी असलेले रायसिंगे कुटुंबीय लग्नाचा बस्ता घेण्यासाठी सकाळी कारने जळगावच्या दिशेने निघाले होते. अडावद रोडवरील चेरी फॅक्टरी जवळ पोहोचताच कारचे पुढील टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली.
या अपघातात बवनबाई भगवान रायसिंगे (वय ६५, रा. अडावद, ता. चोपडा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कैलास शिवा रायसिंगे, पुंडलिक शिवा रायसिंगे, दिनेश पुंडलिक रायसिंगे, रेखा पुंडलिक रायसिंगे आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींसह मृत महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातासंदर्भात अद्याप संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.





