जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२८ । राज्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यातही मागच्या दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. अशातच आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२८ जून ते १ जुलै दरम्यान जळगावसह राज्यातील बहुतांशी भागांत पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.वाऱ्याचा वेग ताशी १५ ते २० किलोमीटरपर्यंत होता.

हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम असणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक भागाच्या पश्चिम भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 28 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. बीड, परभणी आणि लातूरमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
मुंबईत शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. परंतु हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.











