जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्यासाठी “पोलीस पाटील मेळावा” तसेच “विश्वासाची लेन्स छायाचित्र व Reels” स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०३:०० वाजता समर्थ लॉन्स, कानळदा रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीस प्रतिबंध करणे तसेच विविध जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पोलीस पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच त्यांना नवीन कायदे, कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस पाटील यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.

सदर मेळाव्यामध्ये पोलीस पाटील यांना मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप, पोलीस पाटील यांचा सत्कार तसेच नवीन कायदे व पोलीस पाटील यांच्या कार्यासंदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच, जळगाव जिल्हा पोलीस यांच्या वतीने घेण्यात आलेल्या “विश्वासाची लेन्स छायाचित्र स्पर्धा” तसेच “Reels स्पर्धेचा” यांचे बक्षीस वितरण समारंभ यावेळी संपन्न होणार आहे. पोलीस दलाच्या कार्याची सकारात्मक बाजू नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडणे, पोलीस-जनता संवाद व विश्वास वृद्धिंगत करणे तसेच जन-जागृतीस प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धांचा उद्देश आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या मेळाव्यास मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.











