जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशातच बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, तो ओडिशाच्या भागातून वायव्य दिशेने पुढे सरकत आहे.

या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज २ ते ६ सप्टेंबरदरम्यान जळगाव शहरासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, या हवामान प्रणालीमुळे जळगाव शहर किंवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अथवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
चार-पाच दिवस ढगाळ वातावरण
आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता वाढणार असून, तापमानात किंचित घट होऊन नागरिकांना काही प्रमाणात गारवा जाणवू शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उष्ण आणि दमट वातावरणाचा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
खरीप पिकांना पावसाची गरज
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका यासह विविध खरीप पिकांवर परिणाम होत आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, काही ठिकाणी पिकांची वाढही खुंटली आहे. पिकांना सध्या पावसाची नितांत आवश्यकता असताना बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.







