जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या एक-दीड महिन्यापासून विश्रांती घेलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात दमदार पुनरागम केलं आहे. जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रशासनाने हतनूर धरणाचे १० दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. सध्या या दरवाजांमधून तब्बल १५ हजार ८९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील पाण्याची आवक घटली होती. त्यामुळे हतनूर धरणाचे अनेक दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र आता पावसाने पुन्हा कमबॅक केलं असून त्यातच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.

धरणातील वाढती पाणीपातळी आणि आवक लक्षात घेता धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने १० दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धरणातून नदीपात्रात होणाऱ्या विसर्गासोबतच कालव्याद्वारे २०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सिंचनासह इतर गरजांसाठी हा विसर्ग सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, धरणातील आवक आणि पाणीपातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून परिस्थितीनुसार विसर्गात वाढ किंवा घट करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






