जळगाव लाईव्ह न्यूज । गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. जळगाव शहर आणि पाचोरा येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये गुजरातहून आलेला बनावट खवा, बर्फी बनवण्यासाठी वापरले जाणारे संशयास्पद ‘प्रोप्रायटरी फूड’, भेसळयुक्त तूप आणि क्रीम असा एकूण ९२३.४ किलो वजनाचा आणि ४ लाख ३६ हजार २२२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी या कारवाईची माहिती दिली. गणेशोत्सवाच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांवर लक्ष केंद्रित केले आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अमोल जगताप यांच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील अग्रवाल वेफर्स व नमकीन येथे छापा टाकला. या कारवाईत गुजरातहून मागवण्यात आलेले ३७० किलो वजनाचे आणि ९३ हजार २० रुपयांचे प्रोप्रायटरी फूड आढळून आले. विशेष म्हणजे हे पदार्थ दिसायला हुबेहूब खवा किंवा बर्फीसारखे असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मिठाई तयार करण्यासाठी त्याचा वापर करून ग्राहकांना अस्सल दूधजन्य पदार्थ असल्याचा भास निर्माण केला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे प्रशासनाने हा साठा ताब्यात घेतला.
पाचोऱ्यातही कारवाई; संशयास्पद साठा नष्ट
जळगावमधील कारवाईनंतर या प्रकरणाचे धागेदोरे पाचोऱ्यापर्यंत पोहोचले. प्रशासनाच्या पथकाने पाचोरा शहरातील दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सुमारे २ हजार ५०० रुपयांचा संशयास्पद साठा थेट नष्ट करण्यात आला.याच कारवाईदरम्यान पाचोरा येथून १ लाख ३२ हजार ३९२ रुपये किमतीचे १७४.२ किलो संशयास्पद तूप आणि २ लाख ८ हजार ५६० रुपये किमतीचे ३७९.२ किलो क्रीम जप्त करण्यात आले.
सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर प्रशासनाची नजर
गणेशोत्सव, नवरात्र आणि आगामी सणांच्या काळात मिठाई, खवा, तूप, क्रीम यांसारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा गैरफायदा घेत काही व्यापारी भेसळयुक्त किंवा संशयास्पद पदार्थांचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करण्याची शक्यता असते.
त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील मिठाई विक्रेते, खाद्यपदार्थ उत्पादक आणि संबंधित आस्थापनांवर लक्ष केंद्रित केले असून, भेसळखोरांविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही खाद्यपदार्थ खरेदी करताना गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची खात्री करूनच खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






