भुसावळात गावठी कट्टा घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

सप्टेंबर 4, 2026 1:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूल परिसरात गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड घेऊन फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला भुसावळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. गणेश संतोष लोहार (वय २१, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) असं त्याच नाव आहे.

bsld

पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे भुसावळ शहर पोलीस ठाणे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांसह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना गोपनीय माहिती मिळाली की, ‘गण्या लोहार’ नावाचा इसम टेक्निकल हायस्कूल परिसरात गावठी कट्टा घेऊन उभा आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह दोन पंचांच्या उपस्थितीत टेक्निकल हायस्कूल परिसरात धाव घेतली. तेथे एक संशयित तरुण फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव गणेश संतोष लोहार असे सांगितले.

त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस कमरेला खोचलेले गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन आणि दोन जिवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी शस्त्रासह तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह तसेच २ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राऊंड, असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे पिस्टल त्याने कोठून आणले? तसेच त्याचा वापर कशासाठी करणार होता? याबाबत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या पथकाची कारवाई

ही उल्लेखनीय कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत ग्रेपोसई/ईकबाल सैयद, पोलीस कॉन्स्टेबल दीपक शेवरे, गजानन पाटील, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील (चालक) सहभागी झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now