जळगाव शहर

जळगावकरांसाठी नाट्यरसिकांची पर्वणी! २२ नोव्हेंबरपासून रंगणार ६५ वी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा

जळगाव लाईव्ह न्यूज । सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. शहरातील महाकवी कालिदास सभागृह मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव व परिसरातील नाट्यरसिकांना दिवाळीनंतर दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार व इंदोर जिल्ह्यातील एकूण १५ नाट्यसंस्था प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून तालमी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे.

यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे.

महाकवी कालिदास सभागृह
मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे होणाऱ्या या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button