गुन्हेजळगाव शहर

जळगावच्या क्रांती चौकात थरार! पाच-सहा तरुणांचा गोळीबार, हातात तलवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराच्या शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौकात दुचाकींवरून आलेल्या पाच ते सहा तरुणांनी दोन गोळ्या झाडल्याची माहिती असून, त्यांच्या हातात तलवारीही असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. व्याजाच्या पैशांवरून हा प्रकार घडला असल्याची माहिती असून या प्रकारामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रांती चौक परिसरातील एका तरुणाचा शहरातील अन्य भागातील काही तरुणांशी व्याजाच्या पैशांवरून वाद सुरू आहे. याच वादातून मंगळवारी सकाळी दोन्ही बाजूंच्या तरुणांमध्ये भांडण झाले होते. यावेळी एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली होती.

दरम्यान, याच वादातून मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाच ते सहा तरुण दुचाकींवरून क्रांती चौकात आले. त्यांनी गोळीबार केल्याची माहिती असून, घटनास्थळी दोन गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच काही तरुणांच्या हातात तलवारी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.

पोलिसांचा तातडीने घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली.

या प्रकरणात क्रांती चौक परिसरातील एका तरुणाला पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. गोळीबार आणि तलवारी घेऊन तरुणांनी केलेल्या दहशतीच्या प्रकारामुळे क्रांती चौक परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेमागील नेमका वाद आणि गोळीबार करणारे तरुण कोण, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button