जळगाव जिल्हाचाळीसगाव

५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव पडला महागात ; ४ पोलिसांसह १० जणांवर गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । एखाद्या व्यक्तीचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचे भासवून बनावट कागदपत्रे आणि खोटे साक्षीदारांच्या आधारे विमा कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात चार पोलिस कर्मचारी आणि एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील लोकसेवक असलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करण्यास महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नुकतीच मंजुरी दिली होती.

मृत्यूला अपघाताचे स्वरूप दिल्याचा आरोप

९ जून २०२५ रोजी रात्री ७.४८ वाजता जामदा, ता. चाळीसगाव येथील शेतशिवारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू नैसर्गिक अथवा अन्य कारणाने झालेला असतानाही आरोपींनी संगनमत करून तो रस्ते अपघातात झाल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे.यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून तसेच खोटे साक्षीदार उभे करून मेहुणबारे पोलिस ठाण्यात यापूर्वी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या कथित अपघाताच्या कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडे तब्बल ५० लाख रुपयांचा विमा दावा करण्यात आला.

विमा कंपनीच्या तपासात प्रकार उघड

विमा कंपनीकडून क्लेमची तपासणी सुरू असताना कागदपत्रे आणि माहितीमध्ये विसंगती आढळली. तपासात आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती वापरल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तसेच आरोपी कविता संजय पाटील हिने मृत पतीच्या नावावर असलेल्या विमा कंपनीच्या डेबिट कार्डचा वापर करून १० लाख रुपये काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी, डॉक्टरसह १० आरोपी

या प्रकरणात नितेश हिंमत पाटील, आकाश सुनील पाटील, प्रेमचंद त्र्यंबक पाटील, कविता संजय पाटील, तत्कालीन मेहुणबारे पोलीस ठाण्यातील हवालदार रवींद्र एकनाथ बत्तीसे, डॉ. मंदार करंबेळकर, खासगी एजंट प्रवीण मयाराम पाटील, पोलीस नाईक महेंद्र प्रकाश पाटील, हवालदार सचिन अशोक निकम आणि पोलीस शिपाई सुनील अशोक निकम यांचा समावेश आहे.या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिल्ले करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button