
जळगाव लाईव्ह न्यूज । वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर बेफिकीरपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल ५२६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रस्ते अपघातांना आळा घालणे, वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
ड्रंक अँड ड्राइव्हच्या ४९ प्रकरणांची नोंद
मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. यात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४९ चालकांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यातील इतर तरतुदींनुसार सर्वाधिक ३५६ प्रकरणांची नोंद करण्यात आली. याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या १५, कलम १९४ बी अंतर्गत ३१ आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
तसेच विनापरवाना वाहन चालविण्याच्या एका प्रकरणासह कलम ६६/१९२ अंतर्गत ८ आणि हेल्मेट न वापरणाऱ्या ६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. अशा एकूण ५२६ प्रकरणांमध्ये पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांवरही कारवाई
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधातील कारवाईसोबतच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. अशा एकूण ३० व्यक्तींविरुद्ध कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेतून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि स्वतःसह इतरांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





