
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी १९ नोव्हेंबर रोजी आदेश काढत चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या फेरबदलांमध्ये आर्थिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU), शनीपेठ आणि बोदवड पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक आशिष मधुकर लकांडे यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयस्वाल यांची शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून AHTU विभागाच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, पोलीस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथून शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद दत्तात्रय राळेभात यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या दुय्यम अधिकारी पदावरून बोदवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांना AHTU प्रभारी अधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. त्या यापुढे मानव संसाधन विभाग, जळगाव येथे मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पूर्णवेळ कामकाज पाहणार आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक सागर शिंपी यांनाही शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या या आदेशामुळे जिल्हा पोलीस दलातील महत्त्वाच्या शाखा आणि पोलीस ठाण्यांच्या कामकाजात नवे बदल पाहायला मिळणार आहेत.





