
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १ टक्के मुद्रांक शुल्क अधिभारातून जमा झालेल्या रकमेचे वाटप जाहीर केले आहे. या निर्णयानुसार जळगाव महानगरपालिकेला तब्बल २ कोटी २२ लाख २३ हजार ८४७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा निधी पूर्णपणे बिनशर्त स्वरूपाचा असल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांवर, म्हणजेच विक्री, देणगी आणि गहाण व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या १ टक्का अधिभारातून ही रक्कम महापालिकांना वितरित केली जाते. नगर विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील २८ महानगरपालिकांना एकूण ४२१ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निधीच्या वाटपात पुणे महानगरपालिकेला सर्वाधिक १०९ कोटी ५४ लाख रुपये मिळाले आहेत. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेला ९६ कोटी २६ लाख रुपये, नाशिकला २१ कोटी २५ लाख रुपये, तर नागपूर महानगरपालिकेला १८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये जळगाव महानगरपालिकेला मिळालेला २ कोटी २२ लाखांचा निधी शहरातील विविध नागरी विकासकामांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शासनाकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम थेट महानगरपालिकेच्या डीडीओ खात्यात जमा होणार आहे.
दरम्यान, बिनशर्त स्वरूपात मिळणाऱ्या या निधीमुळे जळगाव शहरातील प्रलंबित नागरी विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील विविध विकासकामांसाठी महापालिकेला आर्थिक बळ मिळणार आहे.





