
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील असोदा रोड परिसरात विजेच्या धक्क्याने आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.घरामागील तुटलेली किंवा खुली वायर कट करत असताना मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला. मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने धाव घेतली; मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
राहुल राजू सपकाळे (वय ३५) आणि सुनंदा राजू सपकाळे (वय ५५) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराच्या मागे असलेली एक वायर कट करण्यासाठी राहुल सपकाळे गेला होता. यादरम्यान अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्याला तीव्र विजेचा धक्का बसला.
मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहून आई सुनंदा यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र, मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दोन्ही माय-लेकांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मायलेकाच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश
ही बातमी समजताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.





