⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन का साजरा केला जातो, पोखरण अणुचाचणीशी आहे संबंध

जळगाव लाईव्ह न्यूज । एकेकाळी भारताला साप आणि गारुड्यांचा देश म्हणून हिणवले जायचे, मात्र आज त्याच भारताने थेट अवकाश पर्यंत मजल मारली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे भरीव योगदान आहे. आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा दिवस म्हणजे ११ मे अर्थात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन! ११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. ५८ किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चार पट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम कसे केले हे पाहून जगाला धक्का बसला. भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून तसेच भारताने केलेल्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा ३ या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली. या व्यतिरिक्त, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणार्‍या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचे महत्त्व आणखी वाढवले.

भारताने, अवकाश संशोधन, क्षेपणास्त्र, उपग्रह दळणवळण, आयटी क्षेत्र वगैरे बाबतींतही नेत्रदीपक प्रगती केली आहे. भारताचे तंत्र सामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे. याचा नवा अध्याय ११ मे १९९८ रोजी लिहिला गेला. या दिवशी भारताने, अणुगर्भीय चाचण्या साखळ्यांतील, पोखरण-२
प्रकल्पातील शक्ती-१, शक्ती-२ आणि शक्ती-३ या अणुस्फोट चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. दोनच दिवसांनंतर म्हणजे १३ मे रोजी शक्ती-४ आणि शक्ती-५ आणखी दोन अणुचाचण्या घेतल्या. शक्ती-१ ही प्रभंजन प्रकारची, ४ ते ६ किलोटन क्षमतेची, शक्ती-२ अणुसंमिलन प्रकारची, १२ ते २५ किलो टन क्षमतेची, शक्ती-३ ही १ किलो टनपेक्षा कमी क्षमतेची होती. १३ मेच्या अणुचाचण्या कमी क्षमतेच्या होत्या. या चाचण्यांचे नेतृत्व माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती. १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. या मिशनला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव देण्यात आले होते. एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदम्बरम आणि अनिल काकोडकर हे या चाचण्यांचे शिल्पकार होते. या यशस्वी चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित करत ११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून जाहीर केला.

दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर भर
२०२२ मध्ये इंटिग्रेटेड अ‍ॅप्रोच इन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर
२०२१ मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर
२०२० मध्ये रिबुटिंग इकॉनॉमी थ्रो सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च ट्रान्सलेशन्स (रिस्टार्ट)
२०१९ मध्ये ’सायन्स फॉर पीपल अँड पीपल फॉर सायन्स
२०१८ मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर
२०१७ मध्ये टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल अँड इनक्लुझिव्ह ग्रोथ
२०१६ मध्ये ’टेक्नॉलॉजी एनेबल्स ऑफ स्टार्ट अप इंडिया

अंतराळ तंत्रज्ञानात भारताची मोठी झेप
तंत्रज्ञानाबाबतील बोलत असतांना भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा मोठ्या अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो. एकेकाळी अमेरिका आणि रशिया या अंतराळ क्षेत्रातील महासत्तांकडून भारतास अनेकदा विशिष्ट तंत्रज्ञान नाकारण्यात आल्याचा इतिहास आहे. मात्र, आज या दोन देशांसह जगातील अनेक देशांचे उपग्रह आज इस्रो प्रक्षेपित करीत आहे. ‘चांद्रयान’ आणि ‘मंगळयान’ आणि आगामी ‘गगनयान’ मोहिमांचा संपूर्ण जगात भारतीय अंतराळ कार्यक्रमांचा जगभरात डंका वाजत आहे. भारतीय अंतराळ क्षेत्र गेल्या एका दशकापासून झपाट्याने विस्तारले आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमाची संपूर्ण धुरा अगदी सुरुवातीपासून इस्रोच्या खांद्यावर आहे. रॉकेट, उपग्रह, संपर्क यंत्रणा यांच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास, निर्मिती, प्रक्षेपण, व्यावहारिक उपयोग, सेवा यासर्व गोष्टी इस्रोतर्फे पार पाडल्या जातात.

आज भारताचा अंतराळ कार्यक्रम प्रारंभिक दशकांप्रमाणे रिमोट सेंन्सिंग, हवामान अंदाज आणि दूरसंचार उपग्रह यापुरताच सीमित राहिलेला नाही. त्यात आता टेलिव्हिजन आणि ब्रॉडबॅण्ड सेवा, अंतराळ विज्ञान, संशोधन, नेव्हिगेशन आणि सुरक्षाविषयक तंत्रज्ञान यांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याची केवळ इस्रो हीच एकमेव संस्था पुरेशी ठरणार नाही. अवकाश क्षेत्र खुले केल्याने अंतराळ तंत्रज्ञानासाठी संपूर्ण देशातील क्षमतेचा वापर करता येईल, अंतराळ विकास लवकर साध्य होईल, जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत भारतीय उद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान मिळण्यासाठी सक्षम करणे शक्य होणार आहे. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील.

संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि डॉ.कलाम यांचे चार प्रमुख प्रकल्प
इतिहासकाळात युद्धाचे स्वरूप मर्यादित स्वरुपात विशेषत: समोरा समोर पध्दतीचे असे. जसजसा काळ बदलत गेला तस तसे युध्दाचे स्वरुप बदलत गेले. समोरा समोर येवून लढण्यापेक्षा दुर अंतरावरुन निशाणा साधता येईल, या तंत्रज्ञानाला प्रचंड महत्व आले. यात सुरुवातीच्या टप्प्यात बंदूक किंवा रणगाड्याने लक्ष भेदण्याचे तंत्र ‘क्षेपणास्त्र’ प्रणाली पर्यंत येवून ठेपले. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान ही भविष्याची गरज आहे, याची जाणीव झाल्यामुळे १९८३ साली प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली ‘समाकलित मार्गदर्शित क्षेत्रणास्त्र विकास कार्यक्रम’ उपक्रम सुरू करण्यात आला. डॉ.कलाम यांनी चार प्रमुख प्रकल्प सुरू केले. यात पहिला म्हणजे, भूपृष्ठावरील एका ठिकाणाहून भूपृष्ठावरील दुसर्या लक्ष्यावर मारा करू शकणार्या लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्र
निर्मिती प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘पृथ्वी क्षेपणास्त्र’ या नावाने संबोधिले जाते. दुसरा म्हणजे, भूपृष्ठावरून आकाशातील कमी उंचीवरील लक्ष्यावर मारा करू शकणार्या लहान पल्ल्याची क्षेपणास्त्र निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘त्रिशूळ क्षेपणास्त्र’ या नावाने संबोधिले जाते. तिसरा म्हणजे, भूपृष्ठावरून आकाशातील मध्यम उंचीवरील लक्ष्यावर मारा करू शकणार्या मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्रे निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘आकाश क्षेपणास्त्र’ या नावाने ओळखले जाते आणि चौथा म्हणजे तिसर्या पिढीतील रणगाडाभेदक क्षेपणास्त्र निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘नाग क्षेपणास्त्र’ हे नाव देण्यात आले. या चार प्रकल्पांच्या जोडीने काही वेगळ्या खास प्रणालीच्या ‘अग्नी’ क्षेपणास्त्राचे कार्यदेखील हाती घेण्यात आले.

तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय)
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय)मुळे संपूर्ण जग बदलत चालले आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवा पर्याय पुढे येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नैसर्गिक अथवा मानवी बुद्धिमत्तेचे प्रथम गणिती आणि नंतर कॉम्प्युटर कोडमध्ये रूपांतर करून एखाद्या सिस्टिमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे होय. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जगातील सर्वांत आव्हानात्मक सामाजिक समस्या सोडविण्याची क्षमता आहे. एआयचा अचूक व प्रभावीपणे वापर करुन व्यापक प्रमाणात सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी वापर केला जाऊ शकतो. एआय कडे भविष्यातील सर्वात शक्तीशाली तंत्रज्ञान म्हणून पाहिले जात आहे. या तंत्रज्ञानामध्ये जो पारंगत होवून महारथ प्राप्त करेल तोच
उद्या संपूर्ण जगावर सत्ता गाजवेल!

जय विज्ञान…..