जळगाव जिल्हा

बारडोलीजवळ जामनेर-सुरत एसटीला झालेल्या अपघातावर जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२६ । गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज दि २ जून रोजी मंगळवारी सकाळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) धुळे आणि जामनेर आगाराच्या दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ७ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान या भीषण अपघातानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या दुर्घटनेबाबत जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अधिकृत माहिती देत प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचाव व मदतकार्याचा सविस्तर तपशील दिला आहे. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

rg bus accident

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर बस स्थानकातून सकाळी साडेसात वाजता जामनेर-सुरत ही एसटी बस निघाली होती. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बारडोलीजवळ या बसला भीषण अपघात झाला. अपघातानंतर सीएनजी बसने पेट घेतल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत जळगाव जिल्ह्यातील कुऱ्ह येथील रहिवासी असलेले एसटी बस चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात जामनेर-सुरत बसमधील ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, जखमींचा आकडा आता ३३ वर पोहोचला आहे. सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी बारडोली येथील सरदार पटेल हॉस्पिटल आणि ओम साई हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, मृत्युमुखी पडलेले ७ ही प्रवासी मोठ्या प्रमाणात होरपळले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे प्रशासनाला अत्यंत कठीण जात आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता ‘डीएनए’ (DNA) चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.” चाचणीचे अहवाल आल्यानंतरच मृतांची अधिकृत ओळख स्पष्ट होऊ शकेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button