उद्यापासून अट्रावल येथील मुंजोबा यात्रेला सुरुवात; असे आहेत यात्रेचे वार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२५ । यावल तालुक्यातील अट्रावल (Atraval) येथील जागृत मुंजोबा देवस्थान (Munjoba Temple) यात्रोत्सवास उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान सुरुवात होत आहे. माघ शुद्ध महिन्याच्या पहिल्या शनिवारी १ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. यानंतर ३ रोजी सोमवार, ८ रोजी शनिवार, १० रोजी सोमवार असे चार वार राहणार आहेत. Atraval Munjoba Yatra
अट्रावल- भालोद रस्त्यावर अनेक वर्षापासून जीर्ण वडाच्या वृक्षाखाली मुंजोबा देवस्थान आहे. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. भाविक देवस्थानावर नवस मानत मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. शेतात सोयीची जागा मिळण्यासाठी महिना -दोन महिने अगोदरच मान देणाऱ्या भाविकांना जागा निश्चित करावी लागते.
यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे आल्याचे मुंजोबा मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावल व भुसावळ आगारातून ज्यादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मुजोबा देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पोलीस यंत्रणा देखील सतर्क असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो.
मनोरंजनाची साधने उपलब्ध
यात्रेचे निमित्त जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बर्हाणपूर, खंडवा व इतरत्र ठिकाणाहून खेळणी, पाळणे, सर्कस इतरत्र खेळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. दर्शनाबरोबरच मनोरंजनाची साधनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच मोठ-मोठे विविध स्टॉल येथे सजवून लावलेले असतात.
असे जावे अट्रावला…!
यावल येथून सहा किलोमीटर व अट्रावल- भालोद रस्त्यावर अट्रावल गावाजवळून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर एस.टी. बसने, खासगी वाहनाने जाता येते, याशिवाय भुसावळ- यावल रोडवर राजोरा फाट्यावरून अट्रावल येथे जाता येते.
अग्नीडाग पहावयास मिळतो
या ठिकाणी तीन देवस्थान आहेत. संतोषी मातेचे, मनुदेवीचे व मुंजोबा असे मंदिर आहेत. दरम्यान यात्रेनंतर मुंजोबा देवस्थानावर वाहिलेले लोणी, व इतर निर्माल्य आपोआप पेट घेते अशी आख्यायिका असलेल्या व जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे आजू-बाजूच्या खेड्यागावातून याठिकाणी लोक वर्गणी जमा करुन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडला जातो. या प्रसादाचा लाभ परिसरातील भाविक मोठ्या आनंदाने घेत असतात.