जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तापी मेगारिचार्ज प्रकल्पाबाबत (Tapi Megacharge Project) एक गुडन्यूज समोर आलीय. ती म्हणजे मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Govt) तापी मेगारिचार्ज प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली. यामुळे तापीच्या पुराचे वाहून समुद्रात वाया जाणारे पाणी उपयोगात आणण्यात महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा तालुके सुजलाम् सुफलाम् होतील. तसेच विदर्भातील अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांतील सातपुडालगतच्या भागासही सिंचनाचे मजबूत स्रोत उपलब्ध होतील. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, इच्छापूरलाही लाभ होईल. Madhya Pradesh Govt approves Tapi Megacharge Project

या तापी मेगारिचार्ज प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील २.३४ लाख हेक्टर क्षेत्र तर मध्य प्रदेशातील १.२३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची क्रांती घडणार आहे. तापी मेगारिचार्जसाठी दोन्ही राज्य सरकारांची संमती आवश्यक होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यादव यांनी भोपाळ येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री तुलसीदास सिलावट, माजी शिक्षणमंत्री तथा बऱ्हाणपूरच्या आमदार अर्चना चिटणीस, सिंचन विभागाचे सहायक सचिव राजेश अग्रवाल, मुख्य अभियंता अनिल, मेगारिचार्ज प्रकल्पाचे जळगाव अधीक्षक अभियंता यशवंतराव भदाणे, मुख्य कार्यकारी अभियंता उत्तमराव दाभाडे यांच्या उपस्थितीत सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी देत थेट अंमलबजावणीला हिरवी झेंडी दिली.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील २.३४ लाख हेक्टर आणि मध्य प्रदेशातील १.२३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तत्कालीन केंद्रीय जलशक्तीमंत्री उमा भारती यांनी काही वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे निर्देश दिले होते. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेगारिचार्ज प्रकल्प व गिरणेवरील नारपार योजनेसाठी वित्तीय तरतूद करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. तापी मेगारिचार्ज प्रकल्पासाठी दोन्ही राज्य सरकारांची संमती आवश्यक होती, जी आता मिळाली आहे.
प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार व्ही. डी. पाटील यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा ८० टक्के निधी केंद्र सरकार, १३ टक्के निधी महाराष्ट्र सरकार व ७ टक्के निधी मध्य प्रदेश सरकारला अदा करायचा आहे. हा प्रकल्प १ लाख कोटी लिटर (३० टीएमसी) पाण्याचे जलपुनर्भरण करून कृषी क्षेत्राला मोठी चालना देणार आहे.
कसा असेल हा प्रकल्प?
तापी नदीच्या वाहून जाणार्या पाण्याचे पुनर्भरण करणे हा या तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा उद्देश आहे. १९९९ पासून या प्रकल्पाच्या उभारणीची चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ही प्रक्रिया थांबली होती. २००४ पासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. तापी नदीचे गुजरातला वाहून जाणारे पाणी मेळघाटातील खारीयाघुटीजवळ अडवून नंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या माध्यमातून त्याचे जमिनीत पुनर्भरण केले जाणार आहे. यासाठी सातपुड्याच्या रांगेतुन मध्यप्रदेशातील आशिरगड पासून तापी नदीचे पाणी कालव्याव्दारे वळवून रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील नदी – नाल्यातुन उतरुन मेगा रिचार्ज होवू शकणार आहे. यासाठी मध्यप्रदेशातील खारियागोटी या ठिकाणी तापी नदीवर धरण बांधून त्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी पावसाळयात बर्हाणपूर, यावल, चोपडा व रावेर या तालुक्यात कालव्याच्या माध्यमातून सर्व नदी-नाल्यांमध्ये पुनर्भरण विहिरी करुन पाणी जिरवण्यात येणार. या योजनेमुळे भूजल पातळी १०० फुटांपर्यत येण्याची शक्यता आहे.