जळगाव विधान परिषद निवडणूक: छाननी प्रक्रियेनंतर सर्व १६ अर्ज वैध

जून 2, 2026 6:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२६ । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने तापू लागली आहे. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्वच्या सर्व १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, आता राजकीय आखाड्यात चुरस निर्माण झाली आहे. आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण छाननी प्रक्रियेनंतर निवडणूक प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

vidhanparishad election

जळगाव विधान परिषदेसाठी एकूण १६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर (नंदू) महाजन यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) चे शरद तायडे यांनी उमेवारी अर्ज दाखल केला. विशेष शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच अनिल चौधरी यांनी देखील अर्ज दाखल केला.

आज या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननी दरम्यान ज्या उमेदवारांच्या अर्जांमध्ये काही तांत्रिक त्रुटी किंवा कमतरता आढळल्या होत्या, त्या उमेदवारांना प्रशासनाकडून तात्काळ लेखी सूचना देण्यात आल्या. उमेदवारांनी या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर, छाननी अंती सर्वच्या सर्व १६ उमेदवारांचे अर्ज कायदेशीररित्या वैध ठरवण्यात आले आहेत.

सर्व उमेदवारांचे अर्ज मंजूर झाल्यामुळे आता जळगावमधील राजकीय समीकरणे अधिक रंजक बनली आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी (भाजप), महाविकास आघाडी (मविआ) आणि शिवसेना (शिंदे गट) मधील बंडखोर उमेदवार यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी आणि महाविकास आघाडीचे आव्हान यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, मात्र सध्या तरी सर्व १६ उमेदवार रिंगणात असल्याने जळगावचा राजकीय पारा चांगलाच चढला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now