जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण राहिली होती आणि ज्यांचे नाव लाभार्थी यादीतून हटवण्यात आले होते, अशा महिलांसाठी दिलासादायक वृत्त आहे.

अनेक महिला तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी करू शकलेल्या नाहीत. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. याच मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे. लवकरच ई-केवायसी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, असे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत.

पात्र असलेल्या महिला असतील परंतु त्यांची केवायसी पूर्ण झालेली नसेल तर पुन्हा ई-केवायसी करण्याची तयारी असणाऱ्या महिलांसाठी आम्ही पुन्हा एकदा ई-केवायसीची विंडो ओपन करायला तयार आहोत. त्या महिलांना लाभ द्यायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
…तर एकही रुपया मिळणार नाही!
दरम्यान, यावेळी ई-केवायसीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी एक कडक भूमिकाही मांडली. ते म्हणाले की, ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करताना दिसत नाहीत. हा आकडा अंदाजे ६० ते ८० लाख आहे. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना सरकारकडून पैसे दिले जाणार नाहीत.
तसेच ज्या लाडक्या बहिणी पात्र नसतानाही त्यांनी याआधी लाभ घेतला असेल तर त्या लाडक्या बहिणींकडून आम्ही पैसे वसूलही करणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. ज्या 14 हजार पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत. त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जाणार असल्याचे ते म्हणाले.











