जळगाव लाईव्ह न्यूज । कानबाई (Kanbai), खान्देशात (khandesh) साजरा होणारा एक महत्वाचा उत्सव आहे. हा उत्सव श्रावण (Shrawan) महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी (Sunday) साजरा केला जातो. या सणाला बोलीभाषेत रोट देखील म्हटले जाते. कृषी संकृतीशी नातं अधोरेखित करणारा हा उत्सव आहे. कानबाई हे नेमक्या कोणत्या देवतेचं रूप, आहे हे स्पष्ट नाही. खान्देशातील तापी नदी (Tapi River) ही सुर्यकन्या मानली जाते. इथे सूर्य उपासनेची प्राचीन परंपराही आहे. त्यातूनच कानबाई ही सूर्यपत्नी असल्याचे अनेक दंतकथांमधून दिसून येते.

काही ठिकाणी ती शिवपत्नी पार्वती, कुठे कृष्णाची राधा तर काही ठिकाणी विठ्ठलाची रुक्मिणी असल्याचे मानले जाते. कानबाई ही खान्देशाची ग्रामदैवत असून महाराष्ट्रात कानबाई मातेची मोजकीच मंदिरे आहेत. त्यात प्रामुख्याने चाळीसगांव (Chalisagaon) तालुक्यातील उंबरखेडचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. त्यापाठोपाठ वेल्हाने, बलसाण येथील कानबाई मंदिरे प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काळात बोरकुंड, प्रकाशा, लामकणी व चाळीसगांव येथेही कानबाई मातेची मंदिरे झालेली आहेत.

कानबाई पूजेचा विधी
संपूर्ण खान्देशात कानबाई पूजेचा विधी थोड्याफार फरकाने सर्वत्र सारखा आहे. श्रावण महिन्यातील रविवारच्या पहिल्या दिवशी कानबाई मातेची विधिवत पूजा करून स्थापना केली जाते. मंगल कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून किंवा देवीचा मुखवटा बसवून त्याला कानबाई मातेचं रुप दिले जाते. केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेऊन कानबाई मातेची स्थापना केली जाते. काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.
रोटच्या प्रसादाला विशेष महत्त्व
कानबाईचे लग्न लावण्याचा एक विधी यावेळी होतो. पुढील चार दिवस कानबाईचे. या उत्सवात परंपरेप्रमाणे कानबाईचे रोट केले जातात. या उत्सवात रोटच्या प्रसादाला विशेष महत्त्व असते. कानबाईचे रोट करताना शेर, सव्वाशेर, अडीच शेर या हिशेबाने गहू घेतले जातात. याशिवाय, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू वाढविण्यात येतात. खापरावरच्या पुरण पोळ्या, खी, आमटी, गंगाफळची भाजी असा बेत असतो. रोटचा हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. विशेष म्हणजे हा प्रसाद फक्त भाऊबंदकीतील सदस्यच दिला जातो. इतर कोणालाही ते प्रसाद म्हणून देता येत नाही. कानबाईची पूजा व दर्शनासाठी कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरील जे भाविक येतात त्यांच्यासाठी लाह्या-फुटाणे प्रसाद म्हणून दिले जातात.
तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी या उत्सवाची सांगता होते. वाजत-गाजत, गाणी म्हणत, फुगडी खेळत कानबाईची मिरवणूक नदीकाठी पोहाचते आणि कानबाई उत्सवाची सांगता होते. खान्देशच्या कृषी संकृतीशी जवळीक साधणारा हा उत्सव सर्वांना एकत्र आणून जिव्हाळा घट्ट करणारा सण आहे.











