क्रिकेट खेळताना मृत्यू की घातपात? धरणगावात अडीच महिन्यांनंतर बालकाचा मृतदेह जमिनीतून काढला बाहेर!

जून 2, 2026 9:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा घातपात झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केल्यानंतर, तब्बल अडीच महिन्यांनंतर त्याचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावात ही थरारक घटना असून फॉरेन्सिक पथक, पोलीस आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.

New Project 1

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील रेल गावातील रहिवासी असलेल्या नवल पाटील यांचा अवघ्या १२ वर्षांचा मुलगा गणेश नवल पाटील याला १५ मार्च रोजी क्रिकेट खेळताना छातीवर जोरात बॅट लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर तो अचानक कोसळला. सुरुवातीला ही घटना अपघात मानण्यात आली होती. गावातही क्रिकेट खेळताना अपघात झाल्याचीच चर्चा होती. मात्र, मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी गणेशचे वडील नवल पाटील यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत धक्कादायक आरोप केले.

क्रिकेट खेळताना बॅटचा साधा फटका लागून मुलाचा मृत्यू होणे अशक्यप्राय असल्याचा दावा करत कोणीतरी जाणीवपूर्वक त्याच्या छातीत जोरात बॅट मारली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. मुलाच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आणि प्रशासनाने मृतदेह बाहेर काढून चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

“घटनेच्या काही दिवस आधी गणेशचा काही मुलांशी किरकोळ वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून एका मित्राने गणेशच्या छातीत क्रिकेटची बॅट जोरात मारली आणि त्यातच त्याचा जीव गेला,” असा थेट आणि गंभीर आरोप मयत गणेशचे वडील नवल पाटील यांनी केला आहे. मुलाचा घातपातच झाला असून त्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह काढला बाहेर
धरणगावचे तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक (न्यायवैद्यकीय) पथकाच्या उपस्थितीत मंगळवारी गणेशचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. अडीच महिन्यांनंतर मुलाचे केवळ अवशेष उरलेले बघून वडील नवल पाटील यांच्यासह उपस्थितांना रडू कोसळले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह तातडीने धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसी) विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या घटनेमुळे रेल गावासह संपूर्ण धरणगाव तालुक्यात तीव्र खळबळ उडाली आहे. क्रिकेट खेळता खेळता मुलाचा मृत्यू झाल्याची समजूत आता हत्येच्या संशयात बदलल्याने पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. धुळे येथील वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच गणेशचा मृत्यू नेमका कसा झाला, यावरून पडदा उठणार आहे. जर हा घातपात असल्याचे सिद्ध झाले, तर या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now