जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । साेशल मीडियावर स्वतचे श्रद्धांजली स्टेटस ठेवून जळगाव तालुक्यातील आसोदा येथील एका २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. समाधान मुलचंद कोळी (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, आसोदा येथील समाधान कोळी हा हातगाडीवर सोयाबीन बिर्याणी विक्रीचा व्यवसाय करीत होता. शुक्रवारी पहाटे ५ वाजता त्याने साेशल मीडियावर स्वत:चा फोटो टाकून भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले होते. बहिणीला मोबाइलवर संपर्क साधून तुला आसोदा येथे ताबडतोब यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर बहिणीने आई-वडिलांशी मोबाइलवर संपर्क साधला.
त्यावेळी समाधान हा दुचाकी घेऊन बाहेर गेला असल्याचे त्यांनी मुलीला सांगितले. सकाळी ७.४५ वाजता जळगाव-भादली डाऊन स्टेशनजवळ एका युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याची माहिती एस. एस. ठाकूर यांनी तालुका पोलिसात दिली हाेती.
अज्ञात युवकाच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी साहेबराव पाटील हे घटनास्थळी गेले. दरम्यान, बहिणीचा आलेला फोन व समाधानने सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजलीच्या ठेवलेल्या स्टेटसमुळे गावातील युवकांना संशय आला. नातेवाईक व युवकांनी त्याचा रेल्वे रुळावर शोध घेतला. जळगाव-भादली डाऊन स्टेशनजवळ मृतदेह व दुचाकी आढळून आली. तो मृतदेह समाधानचा असल्याचे आसोदा येथील युवकांनी ओळखले. त्यानंतर मृतदेह जीएमसीत आणण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.