जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी मध्ये एक महत्त्वपूर्ण पोलीस कारवाई झाली आहे, ज्यामध्ये नागपूरहून चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या लसणाच्या गोण्यांची बाजारातील किमत चार लाख 85 हजार रुपये आहे.

मुख्य आरोपी फरार, पोलीस तपास सुरू
साहित्यनगर सुप्रीम कॉलनी येथे एका बंद बेकरीत लसणाच्या गोण्या चोरून आणलेल्या असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, अशोक काळे, रवींद्र परदेशी, शशिकांत मराठे, रतन गीते, नरेंद्र मोरे, राहुल पाटील यांच्या पथकाने तपास केला. तपासात एका बंद बेकरीमध्ये 97 लसणाच्या गोण्या आढळून आल्या. मुख्य आरोपी विनोद गणेश रुढे मात्र फरार आहे.
बेकरी मालकाची माहिती
बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांनी पोलिसांना सांगितले की त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुढे याने हा माल कुठून तरी विकत आणला आहे. मात्र, माल खरेदी बाबत कोणतीही बिले त्यांच्याकडे दिलेली नाहीत. फक्त लसूण साठवण्यासाठी बेकरीत ठेवला आहे. बिले नसल्याने मालकीबाबत संशय आल्याने एमआयडीसी पोलीसांनी सदर माल जप्त केला.
आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
विनोद रुढे यावर मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासात समोर आले की श्याम रमेश मनवाणी यांच्या टाटा ओनियन कंपनी, नागपूरचा लसूण होता, ज्याला नागपूर येथून बुखारो-रांची या ठिकाणी पोचवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक आरोपी विनोद रुढे यांच्याकडे ताब्यात दिला होता. मात्र, विनोदने सदर मालाची पोहोच न करता, स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी अपहार करून लसूण नेला.
पोलीस अधीक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी, जळगाव संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे. जप्त केलेला लसूण श्याम मनवाणी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे आणि त्यांनी जळगाव पोलिसांचे आभार मानले आहेत.