पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा यशस्वी पाठपुरावा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । धरणगाव, चोपडा आणि जळगाव या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकर-भोकर पूल उभारणीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने २० कोटी निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. पुलाच्या पूर्णत्वानंतर परिसरातील नागरिकांना मोठी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील विकासाला वेग मिळणार आहे.
१५० कोटींच्या पुलासाठी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर
८८४ मीटर लांब, १० मीटर रुंद आणि २७ मीटर उंच असलेल्या या पुलाच्या उभारणीसाठी १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग यांनी ५०:५० टक्के खर्चवाटप तत्त्वावर हा प्रकल्प मंजूर केला आहे. यातील ७५ कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले असून, उर्वरित ७५ कोटींचा खर्च जलसंपदा विभाग उचलणार आहे. या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते.
अजून ३६.३३ कोटींच्या निधीसाठी प्रस्ताव
पुलाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा खर्च १०२.६६ कोटींवर पोहोचल्याने ३६.३३ कोटी रुपयांची अतिरिक्त गरज निर्माण झाली. शासनास सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आवश्यक असलेल्या ३६ कोटींपैकी २० कोटी निधी तत्काळ वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांत समाधान
निधी मंजूर झाल्याने परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापारी वर्गात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर धरणगाव, चोपडा आणि जळगाव तालुक्यांमधील नागरिकांना मोठा फायदा होणार असून, दळणवळण सुलभ होणार आहे. यामुळे व्यापारी वर्गाचाही व्यवसाय वाढणार आहे. ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांचे आभार मानले आहे.
बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील आ. चंद्रकांत सोनवणे, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर, अधीक्षक अभियंता वाय. के. भदाणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.