⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खासदार साहेब नाशिक देवळाली शटलबाबत खोटे दावे करणे थांबवा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । गत अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ – नाशिक देवळाली शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे चाकरमन्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. कोरोना आटोक्यात आल्याने रेल्वे प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र देवळाली शटल अद्यापही बंदच असल्यामुळे अप-डाऊन करणार्‍या नोकरदार वर्गासह प्रवाशांची मोठी गैरसोय होते. भुसावळ – नाशिक देवळाली शटल लवकरच सुरु होणार असल्याचा दावा खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून प्रत्येक महिन्यात करण्यात येतो. काही दिवसांपुर्वी त्यांनी रेल्वेमंत्री अजय वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर ही गाडी लवकरच सुरु होणार असल्याचा दावा केला होता. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही त्यांचा दावा फुसका बार ठरला आहे.

भुसावळ – नाशिक देवळाली शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी, नोकरदार व चाकरमन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गाड्या आहेत. मात्र यात मुंबई-भुसावळ पॅसेंजरच्या जागी भुसावळ-इगतपूरी मेमू सुरु करण्यात आली असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र सर्वात महत्वाची गाडी मानली जाणारी नाशिक देवळाली शटल अद्यापही बंदच आहे. भुसावळ डिव्हीजनचे अधिकारी म्हणतात या गाड्या सुरु करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला आहे. तर त्यावर जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे ठरलले उत्तर म्हणजे, आमचा पाठपुरावा सुरु असून लवकरच या गाड्या सुरु होतील. मात्र गेल्या वर्ष-दीडवर्षापासून खासदारांकडून केवळ खोटी आश्‍वासने देण्यात येत आहेत. केंद्रात भाजपाचे सरकार आहे. दोन्ही खासदार भाजपाचेच आहेत, तरीही त्यांची ही साधी मागणी पूर्ण होत नाही म्हणजे खासदारांच्या दिल्लीत कुणी विचारत नाही का? असा प्रश्‍न रेल्वे प्रवाशांना पडत आहे.

चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. गत अडीच वर्षांपासून नाशिक शटल बंद असल्याने नोकरदारांचे हाल सुरू आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आतापर्यंतचा अनुभव पाहता सर्वसामान्यांना केवळ खोटा दिलासा देण्यासाठी व सोपास्कार पार पाडण्यासाठी आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केवळ राज्य सरकार व केंद्र सरकारला केवळ निवेदन देत वेळ मारुन नेली आहे. मात्र अजूनही एक नाशिक शटल सुरु करण्यात त्यांना यश आलेले नाही. आताही खासदार उन्मेष पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेवून निवेदन दिल्याचे सांगितले मात्र ही गाडी सुरु होण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. रेल्वेने आतातरी प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.