वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

ऑगस्ट 14, 2026 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । वीजग्राहकाला बिल कमी बिल येण्याचे आमिष दाखवून वीजचोरीला मदत व मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी जळगाव शहरात एकावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पवन डिगंबर कांडेलकर असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

vij bil jpg webp

महावितरणच्या शनिपेठ कक्षांतर्गत नव्याने बदललेल्या स्मार्ट मीटरद्वारे वीजचोरी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर कांचननगर येथील पंढरी ओंकार येशे यांच्या घरी ५ ऑगस्ट रोजी दुपारी सहायक अभियंता नितीन तायडे, प्रधान तंत्रज्ञ संतोष पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चौधरी यांनी पंचासमक्ष पाहणी केली. वीज मीटरची व वीजपुरवठ्याची सखोल तपासणी केली असता स्मार्ट मीटर बायपास करून वीजवापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. वीज वापरकर्ते रविंद्र पंढरी येशे यांना वीजचोरीचे १ हजाराचे बिल देण्यात आले. हे बिल त्यांनी भरले.

त्यांनी दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, ”२७ जुलै २०२६ रोजी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी पवन डिगंबर कांडेलकर (वय अंदाजे २२ ते २४ वर्षे) याने माझे जुने मीटर बदलून नवीन मीटर लावत असताना माझ्याकडून दोन हजार रुपये मागितले. नवीन मीटरला काम करून देतो आणि ते कोणाच्याही लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला विजेचे बिल अतिशय कमी येईल. असे आमिष देऊन मला लोभात पाडून, फसवून माझ्याकडून दोन हजार रुपये घेऊन मीटरमध्ये छेडछाड केली. मी त्याला वारंवार नकार देऊनही त्याने अनेक बहाणे करून मला आमिष देऊन माझ्याकडून जबरदस्तीने दोन हजार रुपये घेतले.”

सदर ग्राहकाने वीजचोरीचे देयक भरलेले असल्याने व गुन्हा तडजोडपात्र असल्याने वीज ग्राहकाविरुद्ध तक्रार देण्यात आली नाही. परंतु भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३८ अन्वये महावितरण कंपनीच्या मालकीच्या वस्तूंची छेडछाड करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. पवन डिगंबर कांडेलकर याने वीजचोरीसाठी मदत करण्याच्या अप्रामाणिक हेतूने महावितरण कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान केले तसेच महावितरण कंपनीच्या वीज जोडणीत छेडछाड करून महावितरण कंपनीचा महसूल बुडावा या उद्देशाने फसवणूक केली. त्यामुळे पवन कांडेलकर याच्यावर सहायक अभियंता नितीन तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now