जळगाव लाईव्ह न्यूज । मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेला वाद टोकाला जाऊन भावजयीच्या हत्येत रूपांतरित झालेल्या प्रकरणाचा तब्बल चार वर्षांनंतर निकाल लागला आहे. जळगावच्या पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनीत २१ मे २०२२ रोजी योगिता मुकेश सोनार यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांचा सख्खा दीर दिपक लोटन सोनार याला जळगाव जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, दिपक सोनार आणि त्यांची भावजय योगिता सोनार यांच्यात मालमत्तेच्या कागदपत्रांवरून वाद सुरू होता. २१ मे २०२२ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या दिपकने योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गंभीर दुखापत झाल्याने योगिता यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड घटनास्थळीच टाकून तेथून निघून गेल्याचेही तपासात समोर आले.

या खूनप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने न्यायालयासमोर एकूण १७ साक्षीदार तपासले. पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या साक्षी आणि अन्य पुरावे या प्रकरणात निर्णायक ठरले.
सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सादर केलेले साक्षी-पुरावे आणि केलेला प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. जिल्हा न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने दिपक लोटन सोनार याला खूनप्रकरणात दोषी ठरवले न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तब्बल चार वर्षांनंतर लागलेल्या या निकालामुळे खूनप्रकरणाचा न्यायालयीन प्रवास अखेर पूर्ण झाला आहे.











