जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गल्लीतील रस्त्यावर पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत अर्भक आढळल्याने अज्ञात व्यक्तीने ते पहाटेच्या सुमारास रस्त्यावर आणून टाकल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकी काय घडली घटना?
आंबेडकरनगर या दाट लोकवस्तीच्या भागातील एका गल्लीत आज पहाटे नागरिकांना रस्त्यावर रक्ताने माखलेले मृत अर्भक दिसून आले. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक ते पुरावे गोळा केले आणि रीतसर पंचनामा केला.
दाट लोकवस्ती असलेल्या या गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने हे अर्भक टाकून तेथून काढता पाय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हे अर्भक कोणाचे आहे आणि ते कोणी टाकले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व इतर मार्गांनी कसून तपास करत आहेत.










