नागरिकाचे खुले आव्हान : जळगावात प्रत्येक ४०० मीटरवर मूत्रालय दाखवा अन् बक्षीस मिळवा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । जळगाव शहरात प्रत्येक ४०० मिटर अंतरावर २४ तास उपलब्ध असणारी एखादी मुतारी दाखवा व १ हजारांचे बक्षीस मिळवा, असे खुले आवाहन जळगावातील नागरिक चंद्रशेखर कुडे यांनी केले आहे.

शहरात शामाप्रसाद मुखर्जी उद्यान भिंतीलगत बाहेरील बाजूस मुतारी आहे. त्याप्रमाणे नगरपालिकेच्या प्रत्येक बगीच्यालगत व्यापारी संकुलालगत मुतारी हवी. प्रत्येक नगरपालिका व्यपारी संकुल व बगीच्यामधील एक सार्वजनीक शौचालय संकुल हे भींतीलगत‌ बाहेरील बाजूस रस्त्याच्या दर्शनी भागात असायला हवे. 

सध्या काही नगरपालीका व्यापारी संकुल बगीच्यांमध्ये मुतारी शौचालय आहेत पण ते आतील बाजूस असतात पण जवळपास सर्वच बगीचे सकाळी १० ते दुपारी ५ बंद असतात. पण लोकांची रस्त्यावर वर्दळ याच काळात ज्यास्त असते. अनेक खाजगी व्यापारी संकुलांमधे मुतारी, शौचालय नाहीत. काही खाजगी व्यापारी संकुलांमधे आहेत पण फक्त दुकान मालकांसाठी, ग्राहक व इतरांसाठी नाहीत. 

रस्त्यांवरील वाटसरू खाजगी व्यापारी संकुलांमधे येणारे ग्राहक व इतर लोक व काही खाजगी व्यापारी संकुलांमधील पुरुष, स्त्री व्यापारी लघुशंकेसाठी नेहमीच जागा शोधत असतात. ही अतिशय संतापजनक अशोभनीय परिस्थिती आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून जे-जे लोकप्रतिनिधी जळगाव शहरात निवडून आले आहेत व गेल्या ३० ते ४० वर्षांपासून जे-जे जबाबदार सरकारी कर्मचारी जळगाव शहरात होते. व जे-जे बांधकाम व्यावसायिक यासाठी जबाबदार आहेत. त्यासर्वांना हे पाप भोगावे लागणार आहे. कारण धार्मिक ग्रंथ सांगतात कि जैसा कर्म करेगा वैसा फल मिलेगा, असेही चंद्रशेखर कुडे यांनी म्हटले आहे.