⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘एकीचे बळ’ नेमके काय असते?..जिल्ह्यात ‘या’ ग्रामपंयातीने केला विधवा प्रथा बंदीचा ठराव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा.ग्रामपंचायतीने ३१ मे रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत, विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामसभेत मांडून सर्व संमतीने मंजूर केला. या निमित्ताने टाकळी प्र.चा ग्रामपंचायत ही विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

ग्रामसभेच्या सुरूवातीला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जंयतीनिमित्त अभिवादन करून विधवा प्रथा बंदीचा ठराव मांडण्यात आला. ग्रामसभेचे सचिव ग्रामसेवक वाडीले यांनी १७ मे २०२२ चा विधवा प्रथेविरूध्द राज्य सरकारचा निर्णय व विधवा प्रथा बंदीचा ठराव वाचून दाखवला. यावर सकारात्मक चर्चा होऊन सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. मंगळवारी झालेल्या ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून टाकळी सरपंच कविता महाजन या उपस्थित होत्या. याबाबत त्यांनी तालुक्यातील सरंपच, ग्रामसेवकांची भेट घेत जनजागृती देखील केली होती. या सभेला उपस्थित अंनिसच्या पदाधिकारी निता सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. टाकळी प्र.चा.ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. इतर ग्रामपंचायतींनी हा आदर्श घेत महिलांच्या सन्मानासाठी विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करावा, असे आवाहन केले. ह्या ठरावाची अंमलबजावणीसाठी महिलांमध्ये जनजागृती केली जाईल अशी माहिती सरपंच कविता महाजन यांनी दिली.

दरम्यान, टाकळी ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव केल्याने जिल्हाभरातून त्यांच्या कार्याचे काैतुक केले जाते आहे. आगामी काळात या विषयाला लाेकचळवळीचे स्वरुप येण्यास मदत हाेईल, असा विश्वास विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून वर्तवला जाताे आहे. राज्यभरात विधवांच्या विषयांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडून गावकऱ्यांनी हे जे पाऊल उचलले आहे त्याची दखलही घेतली जाते आहे. आगामी काळात ज्या काही अनिष्ट प्रथा असतील त्याही दूर केल्या जातील अशी भावना व्यक्त केली जाते अाहे. ‘एकीचे बळ’ नेमके काय असते? या म्हणीची परिचिती गावकऱ्यांच्या या निर्णयातून जिल्हावासियांना आली आहे.