…मग फडणवीसांसह सगळ्यांचेच राजीनामे घ्या; आ. एकनाथ खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महिलने विनयभंगाचा आरोप केला, यानंतर आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपण राजीनामा देत असल्याचा इशारा दिला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. तसेच शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं. आव्हाड यांचं समर्थन करणाऱ्यालाही या गुन्ह्यात घ्यायला हवं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या वक्तव्यावर आ. एकनाथ खडसे यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. जर का गुन्हे दाखल झाल्यानंतर राजीनामे घेतले जात असतील, तर प्रत्येकाचा राजीनामा मागायचा का? जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात असल्याचं चित्र आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

खडसे पुढे म्हणाले की, ‘या सरकारने आपल्या मंत्र्यांना ट्रेनिंग दिलं आहे. आपण आक्षेपार्ह वक्तव्यासह वर्तनही करा, तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. आतापर्यंत अनेक नेते आणि मंत्र्यांनी आक्षेपार्ह वर्तन केले, मात्र एकावरही अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनावधानाने का होईना, असे वक्तव्य केले, तर मात्र हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही दुरुपयोग झालेला नाही, मात्र आता हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करताना दिसत आहे’, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.