जामनेरमध्ये लाखोंच्या घरफोडीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ६.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुलै 3, 2026 7:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर शहरातील मदनीनगर परिसरात झालेल्या लाखोंच्या घरफोडीचा गुन्हा जामनेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

jamnerchori

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसुद अख्तर मुजफ्फर हुसेन (वय ५०) हे २५ जून ते २९ जून दरम्यान कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मदनीनगर येथील घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर हा संशयित साथीदारांसह परिसरात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोहम्मद फातिर उर्फ गोलू मिया तुफेल मोहम्मद आणि शेख अमीर शेख जाकीर यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी मोहम्मद फातिर याला जामनेर येथून तर शेख अमीर याला नाशिक येथून ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीतील ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदी, ७१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, याच काळात जामनेर पोलिसांनी दुसऱ्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातही यश मिळवत आरिफखान लालखान कंजर (रा. सोनारी) आणि मुबारीक अली खान (रा. केरपाणी, मध्य प्रदेश) या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ७० हजार रुपयांची चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तसेच जामनेर पोलीस ठाण्यातील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now