⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

…तर शेती ठरेल फायद्याची : कृषितज्ज्ञ अभिजित पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । शेतकऱ्यांनी अवास्तव खर्च कमी करून योग्य नियोजन केल्यास शेती नफ्याची ठरू शकते, असे मत कृषितज्ज्ञ अभिजित पाटील यांनी व्यक्त केले.

रावेर येथील रघुशांती फाउंडेशनतर्फे आयोजित भूमिपुत्रांच्या सत्कार व शेतकरी मार्गदर्शन सोहळ्यात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. येथील अग्रसेन भवनात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ.के.बी.पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, जिल्हा कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील, भागवत पाटील, डी.के.महाजन, मोहन पाटील, योगीराज पाटील, नीलकंठ चौधरी, हरीश गणवाणी, सोपान पाटील, प्रल्हाद महाजन, ज्ञानेश्वर महाजन , महेश महाजन, डॉ.धीरज नेहेते, डॉ.एस.आर.पाटील उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत रघुशांती फाउंडेशनचे प्रवीण पाटील, पंकज पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना, डॉ.के.बी.पाटील यांनी शेतकऱ्यांनी भविष्याचा वेध घेऊनच शेती करावी. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. घेतले जाणारे उत्पादन गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम असल्यास मागणी अधिक असते असे सांगितले. पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन यांनी कमी खर्चातील उत्पादन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. संजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० शेतकऱ्यांचा सन्मान पत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार झाला. क्रीडा क्षेत्र ६, साहित्य ३, संगीत २, सहकार १, शैक्षणिक ४, सांस्कृतिक २ आणि आरोग्य क्षेत्रातील तिघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.